योजनां विषयक माहिती

महाराष्ट्र राज्यातील १०१ ते २५० हेक्टर पर्यंतच्या योजनांची बांधकामे व सिंचन व्यवस्थापन करणेसाठी राज्यातील महसूल विभागानुसार प्रत्येक विभागात एक मंडळ कार्यालय असून कार्यालय प्रमुख पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभिंयता आहेत. त्यानुसार या कार्यालयाच्या अधिकाराखाली मंडळ कार्यालये आहेत.

  • लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, ठाणे
  • लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, पुणे
  • लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, नाशिक
  • लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, औरंगाबाद
  • लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, अमरावती 
  • लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) मंडळ, नागपूर

 

या मंडळ कार्यालयांतर्गत सर्वसाधारणपणे एक किंवा दोन जिल्ह्यासाठी एक स्थानिक स्तर विभाग असून त्यांचेकडे १०१ ते २५० हेक्टर पर्यतच्या योजनांची कामे आहेत.

या मंडळ कार्यालयांकडे त्यांच्या कार्यक्षेत्रातील सिंचन विभागांना त्यांचेकडील लघु पाटबंधारे योजनांना तांत्रिक मार्गदर्शन देण्याची जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेकडील सिंचन विभागांकडे प्रामुख्याने ० ते १०० हेक्टर पर्यंतच्या योजनांची कामे आहेत.

याशिवाय दोन्ही विभागांकडे रोहयो अंतर्गतची कामांची व प्रगणनेची जबाबदारी आहे.

 

या कार्यालयाकडून खालील प्रकारच्या योजना हाती घेतल्या जातात.

१)    लघु पाटबंधारे तलाव

लहान नाला/ लहान नदीवर मातीचा आडवा बांध घालून तलाव निर्माण केला जातो, तलाव बांधताना तलावात साठविलेले पाणी जमिनीखालून वाहून जावू नये यासाठी जालारोधी खंदक व बांधार्यामधून पाणी वाहून जावू नये यासाठी गाभा भाराव केला जातो. तसेच भरावाच्या संरक्षणासाठी अश्मपटल , दगडी कोपरा याची तरतूद असते. याशिवाय भरवतील पाणी वाहून जाण्यासाठी गालाकाची तरतूद असते. नाला/नदीचा पावसाळ्यात येणारा पूर वाहून जाण्यासाठी तसेच धरण सुरक्षित राहावे यासाठी सांडवा बांधला जातो. तलावात साठविलेले पाणी कालव्याद्वारे लाभक्षेत्रात देण्यात येते  .

 

२) कोल्हापूर पद्धतीचे बंधारे

को.प.बंधारा  नदीवर संधानकात  बांधता येतो. या बंधाऱ्यात साठविलेले पाणी मुख्यत्वेकरून नदी पत्रातच असतो. या बंधाऱ्याचा उंबरठा पातळी पर्यंत बांधकाम संपूर्ण असून त्यावर ठराविक २ मी. अंतरावर एक मीटर रुंद स्तंभ असतात. या स्तंभावर आवश्यकतेनुसार लहान रस्ता असतो. या बंधाऱ्यात १५ ऑक्टोबर अथवा सप्टेम्बरच्या शेवटच्या आठवडयात पाणी साठवता येते. पाणी साठवण्यासाठी दोन प्रस्तंभामध्ये लोखंडी दारे बसवण्यात येतात. ही द्वारे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतात. त्यामुळे नदीच्या पूराविसर्ग सुरक्षितपणे वाहून जातो. या बंधार्यावरील सिंचन उपसा सिंचन योजनेद्वारे केले जाते.

३) साठवण तलाव

ज्या ठिकाणी लाभक्षेत्र सलग नसते , तसेच चढ उताराचे असते त्या ठिकाणी साठवण तलाव बांधण्यात येतो. सदर बंधारा लघु पाटबंधारे तलावाप्रमाणे बांधण्यात येतो, या तलावास कालवा नसतो. परंतु नदीत पाणी सोडण्यासाठी विमोचक ठेवण्यात येते. यावरील सिंचन उपसा पद्धतीने केले जाते.


४)पाझर तलाव

लहान ओहोळ/ लहान नाल्यावर सदर तलाव बांधण्यात येतो. सदर तलाव मातीचा असून त्याचे बांधकाम लघु पाटबंधारे तलावाप्रमाणेच करण्यात येतो. परंतु या तलावाचा जलरोधी खंदक कमी खोलीचा ठेवण्यात येतो. त्यामुळे या तलावात साठविलेले पाणी जमिनी खाली पाझरून तलावाजवळील विहिरीमधील जलसाठ्यात वाढ होते. या तलावाचे प्रमुख उद्देश जलपुनर्भरणाचा आहे.


५) वळण बंधारा

या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश नदी/ नाल्यामधील प्रवाही पाणी शेतात वळवणे. हा बंधारा कमी उंचीचा असून त्याची साठवण क्षमता कमी असते . या बंधाऱ्याच्या संपूर्ण लांबीतून नदी / नाला पूरविसर्ग जाण्याची तरतूद असते. नदी / नाला यातून येणारे पाणी दोन्ही / एकाच बाजूस वळवून कालव्याद्वारे सिंचन केले जाते.


६) उपसा सिंचन योजना

भौगोलिक परिस्थितीमुळे जे लाभक्षेत्र कालव्याद्वारे प्रवाही सिंचनाने भिजू शकत नाही. अथवा जालास्त्रोतापासून लाभक्षेत्र उंचावर आहेत, त्या ठिकाणी उपसा सिंचन योजनेद्वारा सिंचन करण्यात येते. नदी/ नाला पात्रात किंवा तीरावर विहीर बांधून त्यात पाणी घेतले जाते व ते पाणी विद्युत/ डिझेल पंपाद्वारे नलीकामार्फत लाभक्षेत्रात पोहोचवले जाते. ते पाणी कालव्याद्वारे / उपसाद्वारे लाभक्षेत्रात दिले जाते. तसेच या प्रकारच्या व्यक्तिगत योजना त्यांच्या मालकीच्या विहिरीवर राबविल्या जातात.


७) जलबांध

ज्या नाल्याची रुंदी २० मी. अथवा त्यापेक्षा कमी आहे. तसेच नाला काठ दोन मीटरपेक्षा जास्त आहे व नाला पत्रात खडक आहेत, या ठिकाणी कोल्हापूर पद्धातेच्या बंधाऱ्याऐवजी जलबांध प्रस्तावित करणे योग्य आहे. या जलबांधामध्ये २.०० मी. x १.२० मी. लोखंडी दरवाजे असून ते सर्व दरवाजे (एक व दोन सोडून) खालील बाजूस पडणारे असतात व एक ते दोन वरील बाजूस पडणारे असतात. पावसाळ्यात आवश्यकतेनुसार दरवाजे बंद वा उघडणे आवश्यक आहे. यासाठी दोन अथवा तीन व्यक्तींची गरज लागते. लाभधारकांनी स्वखर्चाने दरवाजे उघडबंद करणे आवश्यक आहे.


८) गॅबियन बंधारे

या बंधाऱ्याचा मुख्य उद्देश भूगर्भातील पाण्याच्या पातळीची पुनर्भरणासाठी, अप्रत्यक्ष सिंचनासाठी व पाणी पुरवठा योजनांच्या तसेच नाला/ नदी पात्राजवळील विहिरींचा कायमस्वरूपी पाण्याच्या स्तोत्रात टिकून राहण्यासाठी पाण्याचा साठा निर्माण करणे. हा बंधारा नाला / नदी यांची पत्र रुंदी २० मी. इतकी अथवा त्यापेक्षा कमी आहे. तसेच बांधणे सोयीस्कर असते.